नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या गाजीपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवरील इंटरनेट सेवा उद्या (रविवार) पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार या भागात इंटरनेट बंद करण्यात आले आहे. 29 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. जी 31 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहिल. केंद्राच्या नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ हजारो शेतकरी या सीमेवर आंदोलन करत आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सिंघू, गाजीपूर, टिकरी सीमा आणि आसपासच्या भागातील इंटरनेट सेवांवर तात्पुरते निर्बंध लादण्यात आले आहेत. सरकारने इंटरनेट बंद केले आहे. हरियाणानेही इंटरनेट बंद केले आहे. बराच काळ पाणी-वीज बंद केली होती. सरकार अशाप्रकारे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. हरियाणामध्येही बर्याच ठिकाणी इंटरनेट बंद आहे. हरियाणा सरकारने शुक्रवारी सोनेपट, पलवल आणि झज्जरसह 17 जिल्ह्यातील सर्व मोबाइल इंटरनेट, एसएमएस सेवा 30 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निलंबित केल्या आहेत, असे शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल म्हणाले.
दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन -
दिल्लीच्या सीमेवर केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी आज (शनिवार) दिवसभर उपोषण करणार आहेत. 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असून त्यांना आदरांजली म्हणून शेतकरी नेत्यांकडून 'सद्भावना दिवस' पाळण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीलील आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणखी धार आली असून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत.