नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने आज(शुक्रवार) मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला गर्दी टाळून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन नियमावलीत करण्यात आले आहे. सर्व सरकारी कार्यालये, राज्य सरकारे, जिल्हा आणि पंचायत स्तरावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे.
जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वांतत्र्य दिनाचा कार्यक्रम वेबकास्ट करण्याचे नियमावलीत म्हटले आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता गर्दी टाळण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. राजधानी दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही साधेपणाणेच साजरा होणार आहे. पंतप्रधानांचे भाषण, ध्वजारोहण, 21 बंदुकांची सलामी देण्यात येऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात येणार आहे.
कोरोना वॉरिअर्सला विशेष निमंत्रण
सध्या देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात असून कोरोना वॉरिअर्स आघाडीवर राहुन या आरोग्य आणीबाणीचा सामना करत आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला बोलावून त्यांचा सन्मान करण्याची सूचना गृह मंत्रालयाने दिली आहे. कोरोना संसर्गापासून बरे झालेल्या नागरिकांनाही बोलाविण्यात यावे, असे नियमावलीत म्हटले.
आत्मनिर्भर भारत संदेशाचा प्रसार
आत्मनिर्भर भारताचा संदेश संपूर्ण देशात पसरविण्याचे गृह मंत्रालयाने सर्व सरकारी विभागांना सागितले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून आत्मनिर्भर भारतचा संदेश देशातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेण्यात यावा, असे मंत्रालयाने नियमावलीत म्हटले आहे.