नवी दिल्ली - पुढील काही आठवडे स्थलांतरीत मजूरांना घरी पाठविण्यासाठी १०० रेल्वे गाड्या दररोज चालवण्यास गृह मंत्रालयाने रल्वे मंत्रालयास सांगितले आहे. गृह मंत्रालयाने रेल्वे विभागातील नोडल अधिकारी आणि राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांबरोबर यासंबंधी बैठक घेतल्याचे गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव एस. श्रीवास्तव काल(सोमवार) पत्रकार परिषदेत सांगितले.
अनेक राज्यामध्ये स्थलांतरीत मजूर अडकून पडले आहेत. सध्या श्रमिक मजूर विशेष सुरू आहेत. त्या अपुऱ्या पडत आहेत. अनेक मजुर रेल्वे मिळेल या आशेने स्टेशनवर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दररोज १०० रेल्वे गाड्या सुरु करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. एकही स्थलांतरीत कामगार पायी चालत गावी जायला नको याची खात्री राज्य सरकारांनी करावी, असे पत्र गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना पाठविले आहे, असेही त्या म्हणाल्या.
जर मजूर पायी रस्त्याने किंवा रेल्वे ट्रॅकने जाताना दिसले तर त्यासाठी बस किंवा ट्रेनची व्यवस्था राज्य सरकारने करावी. जोपर्यंत त्यांची माघारी जाण्याची व्यवस्था होत नाही, त्यांना जवळील निवारागृहामध्ये ठेवण्यात यावे. तेथे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात यावी. आत्तापर्यंत ४६८ विषेश रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्याद्वारे ५ लाख नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.