नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यातील घुसखोरीविरोधी मोहीम बळकट करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांचे सुमारे १० हजार जवान तात्काळ रवाना करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. यावर मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारने आपल्या काश्मीर धोरणाचा पुनर्विचार करून धोरणात बदल करावा असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना मिनाक्षी लेखी यांनी 'मेहबूबांनी दहशतवाद्यांची चिंता करण्यापेक्षा सामान्य नागरिकांची काळजी घ्यावी,' असे विधान केले आहे.
अचानक जवानांची संख्या वाढवल्यामुळे काश्मीर खोऱ्यात मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. पीपल्स डेमॉक्रॉटिक पक्षाच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवान तैनात करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर टीका केली होती. "केंद्र सरकारने आपल्या काश्मीर धोरणाचा पुनर्विचार करून धोरणात बदल करावा. जवानांना खोऱ्यात तैनात केल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय प्रश्न निर्माण झालेला आहे, तो सैन्याच्या मदतीने सोडविता येणार नाही. खोऱ्यात मुळातच मोठ्या संख्येने जवान तैनात आहेत. अतिरिक्त जवान तैनात करून तो सुटणार नाही," अशा शब्दांत मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.
यावर बोलताना खासदार मिनाक्षी लेखी यांनी मेहबूबा यांच्यावर तिरकस टीका केली आहे. "जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दहशतवाद्यांची चिंता करणे थांबवावे. मेहबूबा या राज्याच्या माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी दहशतवाद्यांची काळजी करण्याचे सोडून द्यावे. त्याऐवजी त्यांनी सर्वसामान्य लोकांची काळजी घ्यावी, त्यांचाच विचार करावा." अशी प्रतिक्रिया खासदार मिनाक्षी लेखी यांनी दिली आहे.
काश्मीर खोऱ्यातील घुसखोरीविरोधी मोहिमा बळकट करण्यासाठी आणि तेथील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांचे सुमारे १० हजार जवान तात्काळ रवाना करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) १०० तुकड्या तात्काळ आधारावर काश्मिरात तैनात करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आला आहे. या १०० मध्ये ५० तुकड्या केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो-तिबेटन सीमा पोलीस (आयटीबीपी)च्या प्रत्येकी १० तुकड्यांचा समावेश आहे. तसेच, आणखी १०० तुकड्या खोऱ्यात पाठवण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.