चेन्नई - तामिळनाडूच्या तंजावरमधील बृहदीश्वर मंदिरात काल (बुधवार) महाभिषेक सोहळा पार पडला. मराठा राजघराण्यातील राजपुत्र, बाबाजी राजे भोसले छत्रपती यांच्यासह लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आयोजित करण्यात आलेला हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
असा पार पडला महाभिषेक..
शनिवारी यागा सलाई येथील यागा पूजेने या संपूर्ण विधीला सुरुवात झाली. तर, बुधवारी सकाळी सातच्या सुमारास मंदिरात पार पडलेल्या 'महापूर्णाहूती'ने मुख्य महाभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली. यानंतर सकाळी ९.२० च्या सुमारास यागा सलाईवरून आणलेल्या पवित्र पाण्याचा श्री बृहदीश्वर आणि ब्रह्ननायकी देवीच्या मंदिराच्या कळसावर अभिषेक करण्यात आला. २१६ फूट उंच असलेल्या या कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी ९.४५ च्या सुमारास पेरुवुदईयार (बृहदीश्वर) आणि पेरियानायकी (ब्रह्ननायकी) यांच्या मूर्तींवरही या पवित्र पाण्याचा अभिषेक करण्यात आला.
तब्बल एक हजार वर्षांहून जुने आहे मंदिर..
या मंदिराची स्थापना सन १००३ ते १०१० च्या दरम्यान चोल साम्राज्याचे राजे पहिले राजराज चोल यांनी केली होती. तेव्हाचे हे जगातील सर्वात भव्य असे मंदिर मानले जाते. विशिष्ट संरचनेसाठीही हे मंदिर प्रसिद्ध आहे. सन १९८७ मध्ये या मंदिराला युनेस्कोमार्फत जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली.
मराठा राजघराणे आणि बृहदीश्वर मंदिर..
मराठा राजघराण्यातील बाबाजी राजे भोसले छत्रपती हे या सोहळ्याला उपस्थित होते. चोल साम्राज्यानंतर तामिळनाडूवर नायकांची सत्ता होती. त्यानंतर सुमारे १५० वर्षांपर्यंत तंजावर हे मराठ्यांच्या अधिपत्याखाली होते. त्यामुळे आपसूकच या मंदिराची जबाबदारीही मराठा राजघराण्याकडे होती. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी या मंदिराची जबाबदारी मराठा राजघराण्याकडेच दिली. मात्र आता, हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी संस्था (एचआरसीईडी) आणि मंदिर प्रशासनाकडे या मंदिराची जबाबदारी आहे.
यापुढे ४८ दिवसांपर्यंत या मंदिरात विशेष पूजा असणार आहे.
हेही वाचा : कर्नाटक उच्च न्यायालयाने नित्यानंदचा जामीन केला रद्द!