श्रीनगर - जम्मू काश्मिरात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. यात 'पिपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन' या आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे आता सत्तास्थापनेची तयारी सुरू झाली आहे. आज गुपकर अलायन्समधील सहभागी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली.
गुपकर अलायन्स मजबूत
यावेळी आघाडी पक्षातील नेत्यांनी गुपकर अलायन्स मजबूत असून लोकांनी आम्हाला निवडल्याचे मत व्यक्त केले. डीडीसी निवडणुकांचे निकाल समोर आले असून जनतेनं आम्हाल बहुमत दिलं. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त शांततापूर्ण निवडणूक होती. आमची आघाडी एकजूट आहे, असे जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद गनी लोन यांनी म्हटले.
४ जी सेवा पुन्हा सुरू करा -
यावेळी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले की, आम्ही एकजूट होवून काम करणार आहोत. काश्मिरात पाणी आणि वीज नागरिकांना दिली जाईल. अनेक वर्षांपासून नागरिकांना ह्या सुविधा मिळत नाहीत. काश्मिरात पुन्हा फोर जी सेवा दिली जावी, यासाठी आम्ही राज्यपालांना विनंती केली आहे. इंटरनेटशिवाय येथील व्यापार आणि विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोदी ५ जी सेवा देण्याच्या बाता करत आहेत, मात्र, आम्हाला पुन्हा ४ जी सेवा मिळायला पाहिजे, असे ते म्हणाले.
जम्मू काश्मीर डीडीसी निवडणुकांत गुपकर अलायन्सला ११० जागा मिळाल्या. तर भाजपाला ७४ जागा मिळाल्या. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे.