मुंबई - शिवसेना-भाजपच्या युतीनंतर आज वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे. भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षातील आमदारांना यावेळी स्वतः मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, या स्नेहभोजनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या बाजूलाच असलेल्या मंत्री महादेव जानकर यांच्या 'मुक्तगिरी' बंगल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मित्र पक्षांची बैठक होत आहे.
या बैठकीत रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांच्यात लोकसभा उमेदवारी लढविण्यासाठी चर्चा होणार आहे. मंत्रीरामदास आठवले यांनी मुबंई दक्षिण, मध्य आणि ईशान्य मुंबईमधील एक जागा, तर लातूर, रामटेक, सोलापूर यापैकी एका जागेची मागणी केली आहे. राजू शेट्टी यांच्याविरोधात हातकणंगलेमधून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे, तर महादेव जानकर बारामतीमधून 'कप बशी' चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. मित्रपक्षांच्या जागा मागणीमुळे भाजप शिवसेनेपुढे नवा पेच निर्माण होणार आहे.