गुवाहटी - भारतात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्यसेविकांसाठी अत्यावश्यक पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स (पीपीई) चीनने मदतीच्या स्वरुपात भारताला दिले आहेत. आज पहाटे चीनमधून वैद्यकीय सामग्रीसह 50 हजार 'पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट'(पीपीई) किट्सची खेप गुवाहटी येथे पोहोचली आहे.
ब्ल्यू डार्ट एअर कार्गो हे चीनधील गुआंगझौहून येथून आज गुवाहटी येथे 50 हजार 'पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट'(पीपीई) किट्स आणि वैद्यकीय सामग्री घेऊन पोहोचले आहे. आसाम आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूशी लढत असलेल्या देशांना मदत करण्याच्या चीन सरकारच्या धोरणानुसार हे किट्स भारताला मदत स्वरुपात देण्यात आले.
दरम्यान चीनमधून कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट्सही येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये तब्बल 3 लाख रॅपिड टेस्टिंग किट्स असणार आहेत. त्यामुळे कोरोना चाचण्या जलदगतीने करणे शक्य होणार आहे. सध्या देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, या राज्यांमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.