तिरुवनंतपूरम - मुसळधार पावसामुळे केरळच्या काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे एडमालक्कुडी येथील पेट्टीमुडी येथे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. भूस्खलन घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जणांना वाचवण्यात आले असून 50 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.
टेकडीच्या शिखरावर लोक अडकली असून आम्ही प्रतिसादाची वाट पाहत आहोत, असे राज्याचे उर्जामंत्री एम. मणी यांनी सांगितले. तसेच आपत्कालीन बचाव दल घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत असल्याचे महसूलमंत्री ई. चंद्रशेखरन म्हणाले. तर बचाव कार्यासाठी राज्य सरकारने भारतीय हवाई दलास विनंती केली आहे.
हेही वाचा - प्रियांका गांधी यांना शिमल्यात येण्यास परवानगी नाकारली
पेट्टीमुडी हा संपूर्ण परिसर पर्वताने व्यापलेला आहे. येथे सुमारे 80 कुटुंबे राहत होती. रहिवाशांपैकी एकाने मुन्नार गाठले आणि घटनेची माहिती दिली. जिल्ह्यातील राजमला भागात भूस्खलन झाले असून तेथे पोहोचणे अवघड असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गुरुवारी इडुक्की जिल्ह्यातील पर्यायी पूलही मुसळधार पावसामुळे कोसळला होता. इतकेच नव्हे, तर मुथिरापूजा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रसिद्ध पर्यटन स्थळ मुन्नारसारख्या सखल भागातही पूर आला आहे.
मागील तीन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी वायनाड, इडुक्की आणि मलप्पुरम जिल्ह्यातील डोंगराळ जिल्ह्यांसाठीही रेड अलर्ट जारी केला होता.