शिमला - मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर हिमाचल प्रदेशमध्ये ३ मेपर्यंत लॉकडाऊनसह कर्फ्यूदेखील राहणार असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त आरोग्य मुख्य सचिव आरडी धीमान यांनी मंगळवारी शिमलामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, घरातून बाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच तोंड न झाकता फिरताना दिसणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. तर, राज्यातील सर्वात मोठे रुग्णालय आणि शिक्षण संस्था असलेल्या आयजीएमसीमध्ये बुधवारी सामान्य दिवसांसारखीच ओपीडी सेवा सुरू करण्यात येईल. त्यांच्यासह सर्व विभाध्यक्ष आणि सचिव हे कमीतकमी कर्मचारीवर्गासोबत येतील, असेही ते म्हणाले. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन हे कोव्हीड -१९ फंडमध्ये जमा होईल. या सोबतच, राज्यात कर्फ्यू असला तरीही त्यात शिथिलता राहिल. राज्यात सध्याच्या स्थितीत सुरू असलेली संचारबंदी ही ३ मेपर्यंत चालण्यासंदर्भात सरकारने निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या निर्देशानुसार, १५ एप्रिल ते ३ मे पर्यंत हे नियम लागू असणार आहेत. याव्यतिरिक्त राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थाही बंद असतील. राज्यभरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, सिनेमागृह आदी सर्व ३ मेपर्यंत बंद राहणार आहे. राज्यात जास्तीतजास्त टेस्टींग लॅबमध्ये कोरोनाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. पालमपूर येथे एक टेस्टींग लॅब सुरू करण्यास परवानगी मिळाली असून काही औपचारिकता शिल्लक असल्याचे धीमान यांनी सांगितले.