गुवाहाटी(आसाम)- आसाम राज्यातील पूर परिस्थितीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुधारणा होत आहे. राज्यात सध्या नऊ लाख लोक पूरग्रस्त आहेत. ही संख्या 24 जुलै रोजी 28 लाख इतकी होती. 24 जुलै नंतर पाऊस कमी झाल्यामुळे पूर परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आसाम आणि ईशान्येकडील राज्यांना दिलासा मिळाला आहे
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी राज्यात सध्या 1087 गावांमधील नऊ लाख लोक पूरबाधित असल्याचे जाहीर केले. 24 जुलै रोजी राज्यातील तब्बल 28 लाख लोकांना पुराचा फटका बसला होता. 2 हजार 543 गाव यांचा यामध्ये समावेश होता, ही गावे 26 जिल्ह्यांमधील होती.
51 हजार 770 हेक्टर जमिनीवरील पिके सध्या पाण्याखाली आहेत. 24 जुलैला 1 लाख 22 हजार 573 हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली होती.
राज्यातील एकूण 33 जिल्ह्यात पैकी 19 जिल्ह्यातील 9 लाख लोक सध्या पूरबाधित आहेत. पश्चिमेकडील 6 जिल्ह्यातील सहा लाख 26 हजार लोकांचा यात समावेश आहे. यामध्ये गोलपारा 3 लाख 3 हजार 937, मोरीगाव 1 लाख 7 हजार 578,भोंगईगाव 63 हजार 194, बारपेटा 41 हजार 716, गोलाघाट 26 हजार 184, धुबरी 27 हजार 930 आणि लखममीपुर येथील 55 हजार 691 नागरिकांचा समावेश आहे
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ब्रह्मपुत्रा नदी सह 6 नद्यांना आलेल्या पुरामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले. सोनित्पुर ब्रह्मपुत्रा जिया भार्ली नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याचे सांगितले.
शनिवार आणि रविवारी पुरामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची घटना उघड झालेली नाही. पूर परिस्थितीमुळे 22 जिल्ह्यातील 109 व्यक्तींचा मृत्यू झाला, यामध्ये महिला, मुले यांचा समावेश आहे. दरड कोसळण्याच्या घटनांमुळे 22 मेपासून 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 147 जंगली प्राण्यांचा मृत्यू झाला असून 170 प्राण्यांना वाचवण्यात आले आहे. काझिरंगा नॅशनल पार्कचा 50 टक्के भाग पाण्याखाली गेला असून दहा दिवसांपूर्वी 95 टक्के भाग पाण्याखाली गेलेला होता.
पूर्व हिमालयातील जैवविविधतेने संपन्न अशा भागात काझिरंगा नॅशनल पार्क वसले असून ते गोलाघाट आणि नागाव जिल्ह्याच्या मध्ये आहे. मानस, आर.जी. ओरंग तींसुकिया नॅशनल पार्क, पाबिटोर, तींसुकिया वन्यजीव अभयारण्य यालाही पुराचा फटका बसला आहे.