चंदीगड - देशभरात आजपासून (शनिवार) कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र, हरयाणा राज्यातील काही कोरोना योद्ध्यांनी कोरोनाची लस घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. रेवारी येथील पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी कोरोना लस टोचण्यास नकार दिला आहे.
बरे वाईट झाले तर कोण जबाबदारी घेणार -
'जर आम्हाला काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असे सवाल काही कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. या कर्मचाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आरोग्य अधिकाऱ्यांनी केला. पहिल्या दिवशी १०० पहील्या फळीतील कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार होती. मात्र, फक्त ४७ कर्मचारी लस घेण्यास पोहचले. १८ कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार दिला.
३ कोटी पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू -
३ कोटी पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च भारत सरकार उचलणार आहे. त्यासाठी आजपासून लसीकरण सुरू झाले. सुरूवातील आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. कोविन अॅपमध्ये सर्व माहिती जमा असेल. त्याद्वारे दुसरा लसीचा डोस कधी घ्यायचा याची माहिती मोबाईलवर मिळणार. लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. एक डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्यास विसरू नका. दोन्ही डोस दरम्यान सुमारे महिन्याचा काळ लागेल. त्यानंतर दोन आठवड्यांनी शरिरात प्रतिकारक्षमता तयार होईल. मात्र, लस घेतल्यानंतर निष्काळजीपणा करू नका. मास्क आणि कोरोना नियमावलीचे पालन करा, असे आज पंतप्रधान मोदींनी लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सांगितले.
देशात आत्तापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर १ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचे कोरोनाने बळी घेतले. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील ३००६ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १०० लाभार्थ्यांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.