सोनीपत - बडोदा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून 1 नोव्हेंबरला थांबेल. त्याआधी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी भाजप-जेजेपीचे उमेदवार योगेश्वर दत्त यांच्या प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
कृषी कायद्याच्या नावाखाली काँग्रेस शेतकऱ्यांना चुकीची माहिती देत आहे. आजही शेतकर्यांचे पीक एमएसपीवर खरेदी केले जात आहे. बाजार पूर्वीप्रमाणेच चालू आहे आणि भविष्यातही चालू राहील. जर एमएसपी बंद झाली, तर मी राजकारण सोडेल, असे मनोहरलाल खट्टर म्हणाले.
3 नोव्हेंबरला गुजरात पोटनिवडणूक -
गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये एकूण 81 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे या जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. अब्दासा, लिम्बडी, मोरबी, धारी, गधाडा, कर्जान, डांग आणि काप्राडा या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.
काय आहेत कृषी कायदे ?
केंद्र सरकारने जूनमध्ये जारी केलेल्या अध्यादेशांना कायदेशीर मंजुरी देण्यासाठी लोकसभेत तीन विधेयके पारित केली गेली. ही विधेयके शेतकरी हिताची असल्याचे सरकारने म्हटले आहे. या तीन कृषी विधेयकांपैकी पहिले विधेयक म्हणजे शेतकऱ्याला देशात कोणत्याही ठिकाणी त्याचे पीक विकण्याचे स्वातंत्र्य. दुसरे विधेयक म्हणजे व्यापाऱ्यासोबत शेतकर्यांने केलेल्या आगाऊ कराराला कायदेशीर मान्यता. तिसरे विधेयक म्हणजे - डाळी, तेल बियाणे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरील निर्बंध दूर करणे. तथापि, कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. तसेच कृषी विधेयकातील अनेक तरतुदींमुळे शेतकरी कॉर्पोरेट कंपन्याच्या हातातील बाहुले बनतील, असा आरोप काँग्रेसने केला आहे.