नवी दिल्ली - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने देशभरात दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन केला. या लॉकडाऊननंतर आता केंद्र सरकार निर्बंध हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे आता फिरू लागली असून, नागरिकांवरील बंधने आता हळूहळू कमी होत आहेत. यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशवासियांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याच बरोबर आत्मनिर्भर भारत अभियान या दशकात देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातील महत्वाचे मुद्दे -
- मागील वेळी मी जेव्हा तुमच्यासोबत ‘मन की बात’ केली होती. तेव्हा प्रवासी ट्रेन बंद होत्या, बस बंद होत्या, विमान सेवा बंद होती. यावेळी खूप काही सुरु झाले आहे. संपूर्ण सावधगिरी बाळगून, विमाने सेवा आणि हळूहळू उद्योग देखील सुरु करण्यात येत आहेत. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेचा एक खूप मोठा भाग आता सुरु झाला आहे. अशावेळी आता आपल्याला अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाबाबत थोडाही निष्काळजीपणा करू नका.
- प्रत्येकाच्या सामुहिक प्रयत्नांमुळे देशातील कोरोनाविरुद्धची लढाई मजबुतीने लढली जात आहे. आपण जगाकडे बघतो, तेव्हा आपल्याला लक्षात येते की, भारतवासियांचे यश किती मोठे आहे. बहुतांश देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या कित्येक पटीने जास्त आहे. आपल्या देशात विविध प्रकारची आव्हाने आहेत, परंतु तरीही, कोरोना आपल्या देशात इतक्या वेगाने पसरलेला नाही जितका तो जगातील इतर देशांमध्ये पसरला आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूप कमी आहे.
- नाशिकच्या एका खेड्यातील शेतकरी राजेंद्र यादव यांनी आपल्या गावाला कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी ट्रॅक्टरला एक उपकरण जोडून स्वच्छता यंत्र तयार केले असून ही नाविन्यपूर्ण मशीन अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. अनेक दुकानदारांनी सहा फुट अंतरावर दुकानात एक मोठा पाइप बसवला आहे, ज्यामध्ये वरच्या एका टोकत ते माल टाकतात आणि दुसर्या टोकाला ग्राहक त्यांचा माल घेतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे शैक्षणिक क्षेत्रात अनेक नवीन कल्पना अंमलात आणल्या आहेत. ऑनलाइन वर्ग, व्हिडिओ वर्ग यांच्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळे मार्ग शोधले आहेत .
- कोरोना लसी संदर्भात आमच्या प्रयोगशाळामध्ये जे काम सुरु त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे आणि आम्हाला सगळ्यांना आशा देखील आहे.
- आज रेल्वेचे कर्मचारी ज्याप्रकारे एकत्रितपणे काम करत आहेत ते देखील एकप्रकारे आघाडीचे कोरोना योद्धेच आहेत. लाखो कामगारांना, रेल्वे आणि बसमधून सुरक्षितपणे घेऊन जायचे, त्यांच्या जेवणाची काळजी घेणे, प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण केंद्रे सुरु करणे, चाचणी करणे, तपासणी करणे, सर्वांवर उपचार करणे या सर्व गोष्टी सतत चालू आहेत.
- मला विश्वास आहे की आत्मनिर्भर भारत अभियान या दशकात देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.
- मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिन जवळ आला आहे. जसा-जसा ‘योग’ लोकांच्या आयुष्याचा एक भाग बनत आहे, सध्या, कोरोना संकटाच्या काळात देखील हॉलिवूडपासून हरिद्वारपर्यंत, घरात राहून लोक 'योग'कडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.