भूवनेश्वर (ओडीशा) - एक ७० वर्षीय महिलेने तिच्या आईला खाटेसह ओढत पेंशनसाठी बँकेत नेल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी उत्कल ग्रामीण बँकेच्या बारागाव शाखेच्या व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले आहे. ओडीशा सरकारने व्यवस्थापकावर कारवाईची मागणी बँकेकडे केली होती.
पेंशनच्या रकमेसाठी १०० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धेला शारिरीक पडताळणीसाठी बँकेत बोलावल्याने बारागाव शाखेचे व्यवस्थापक अजित कुमार प्रधानला निलंबित करण्यात आले. अजित कुमारविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे देखील बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी एक ७० वर्षीय महिलेने तिच्या आईला खाटेसह ओढत पेंशनसाठी बँकेत नेल्याची घटना समोर आली होती. बँक कर्मचाऱ्यांनी वृद्धेला शारीरिक पडताळणीसाठी बँकेत आणण्यास सांगितल्याने महिलेने हे पाऊल उचलले. ही घटना खरीयार परिसरातील बारागन गावात घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला लाभेल बघेल हिने तिची मुलगी गुंजा देवीला (७० वर्ष) तिच्या पेंशनच्या खात्यातून १५०० रुपये काढून आणायला पाठविले. मात्र, अधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार देत वृद्धेला शारीरिक पडताळणीसाठी बँकेत आणण्यास सांगितले. त्यामुळे स्वतः ज्येष्ठ नागरिक असलेल्या गुंजादेवीकडे वृद्धेला खाटेसह बँकेत नेण्याशिवाय पर्याय नव्हता. दोघींनाही बँकेत बघितल्यानंतर त्यांना पैसे देण्यात आले.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक आमदार अधिराज पानीग्रही यांनी बँक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत कारवाईची मागणी केली होती.