नागाव (आसाम) - आसाममध्ये अनेकदा माणूस आणि वन्य हत्तींमध्ये संघर्ष पहायला मिळाला आहे. यात तब्बल २४९ हत्ती आणि ७६१ माणसांचा समावेश आहे. राज्यातील वन्य जमिनीवरील अन्नाच्या कमतरतेमुळे हा संघर्ष उभा राहिला आहे. दर वर्षी वन्य हत्ती डोंगरांवरून अन्न आणि पाण्यासाठी खाली येतात. यामुळे आसामच्या नागाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताच्या शेतांचे प्रचंड नुकसान होते.
नागाव राजधानी दिसपूरपासून ११० किलोमीटरवर वसलेले असून वन्य हत्ती आणि माणसांच्या संघर्षात हत्ती आणि माणसांची मोठी जीवितहानी झाली आहे. हत्तींच्या कळपांकडून जिल्ह्यांतील भाताच्या शेतांचे मोठे नुकसान होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, २४९ हत्ती जखमी झाले. तर, ९२ विजेचा झटका लागून मृत्युमुखी पडले. ५४ हत्ती रेल्वेशी धडक होऊन मरण पावले. २० हत्तींची शिकार झाली. ५३ हत्तींचा अपघातांमध्ये मृत्यू झाला. तर, ३० हत्तींवर विषप्रयोग करून त्यांना ठार करण्यात आले.
याआधी हत्तींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नागावमधील ग्रामस्थांनी अनेक उपाय केले. मात्र, त्यातला कोणताही यशस्वी झाला नाही.
सध्या निसर्गप्रेमी बिनोद डुलू बोरा या स्थानिक तरुणाने पुढाकार घेत या समस्येवर अगदी अनोखा उपाय शोधून काढला आहे. यामुळे हत्तींना अन्नही मिळेल आणि त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही.
बोरा यांनी ग्रामस्थांना आवाहन करून त्यांच्याकडून एकंदर २०० बिघा (अंदाजे ३३ हेक्टर) जमीन मिळवली. या दान मिळालेल्या जमिनीवर त्यांनी लोकसहभागातून हत्तींसाठी 'फूड झोन' तयार केला आहे.
अनेक गरीब शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीची अत्यंत कमी जमीन असताना आणि त्यामध्ये स्वतःच्या कुटुंबाचेही भागत नसतानाही हत्तींसाठी जमीन दान करण्याची तयारी दर्शवली. या जमिनीवर हत्तींना पुरेशा प्रमाणात अन्न मिळेल, अशा दृष्टीने शेती करण्यात येत आहे. कार्बी हिलॉक या परिसरात डोंगरउतारावर चक्क हत्तींसाठी भातशेती करण्यात येत आहे. निसर्गप्रेमी बिनोद आणि त्यांची पत्नी हत्ती आणि माणसातील संघर्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
डोंगरउतारावरील शेतीमुळे हत्तींना डोंगराखालील शेतांमध्ये येण्याची गरज पडणार नाही. हत्तींना आवडणारे अन्न म्हणजे भातशेती, नेपियर गवत, केळींची झाडे, ऊस आदी या भागात लावण्यात येत आहेत.
नागावमध्ये राबवण्यात आलेली अत्यंत नावीन्यपूर्ण कल्पना यशस्वी होत असल्याचे पाहून शेजारील सामागुरी आणि बेहरामपूर येथील शेतकऱ्यांनीही हाच उपाय करणे सुरू केले आहे. ६० बिघा जमिनीवर (अंदाजे १० हेक्टर) हत्तींच्या आरोग्यासाठी पोषक ठरेल, असे गवत लावण्यात येत आहे. सापानालाजवळील हाथीगुडी परिसरात हत्तींसाठी भात पिकवण्यात येत आहे.
२०१८ मधील हिवाळ्यात कार्बी हिलॉक येथे झालेल्या हल्ल्यामध्ये हाथीगुडी आणि रंघा या भागांमधील लोकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, आता परिस्थिती बदलत असल्याचे दिसते. आता हत्तींचे शेतात घुसून नासाडी करण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा येथील वन विभागाने केला आहे.
निसर्गप्रेमी बोरा भाताची शेती करतात. तसेच, ते 'हाथी बंधू' या वन्य जीवन संवर्धनासाठी काम करणाऱ्या बिगर शासकीय संस्थेचे सदस्य आहेत. बोरा यांची पत्नी मेघना मयूर याही यामध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत.
२०० बिघा जमिनीवर हत्तींसाठी भातशेती करणे केवळ गावातील लोकांच्या सक्रिय सहकार्यामुळेच शक्य झाले असल्याचे प्रदीप भूयान यांनी म्हटले आहे. येथील विभागीय वन अधिकारी राजेन चौधरी यांनीही हे मान्य केले असल्याचे ते म्हणाले.