नवी दिल्ली - भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील एका 28 वर्षीय व्यक्तीने क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
संबधित व्यक्ती ही गोपाळगंज येथील रहिवासी होती. व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, चाचणी अहवाल येण्यापूर्वीच पंचायत भवनच्या लेस्लीगंज ब्लॉक येथील एका खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. उपायुक्त शांतनु कुमार यांनी ही माहिती दिली.
याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून संभाव्य रुग्णाने कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे अद्याप निश्चित नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान राज्य सरकारने लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. लोकांना मदत करण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागने हेल्पलाईन क्रमांक जारी केला.