नवी दिल्ली - नितीश कुमार फक्त बिहारमध्येच एनडीएसोबत आहेत. ते दुसऱ्या राज्यात भाजपविरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय स्वागत करण्या योग्य आहे. यामुळे मी नितीश कुमारांचे आभार मानत आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
३० मे रोजी झालेल्या पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यातून नितीश कुमारांच्या जदयूने काढता पाय घेतला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त १ मंत्रीपद दिल्यामुळे नितीशकुमार नाराज होते. परंतु, नितीश कुमारांनी अचानक मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शाह नाराज आहेत. त्यामुळे, जदयू आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता नितीश कुमारांनी बिहार सोडून एनडीएला सोडचिठ्ठी दिल्याने भाजप-जदयूमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी जदयूचे रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधला होता. ममतांनी प्रशांत किशोर यांना तृणमूल काँग्रेससाठी रणनिती आखण्यासाठी सांगितले आहे. यानंतर, जदयुने स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, ममतांसाठी काम करण्याचा निर्णय हा प्रशांत किशोर यांच्या कंपनीचा वैयक्तीक निर्णय आहे. याचा आणि पक्षाचा काहीही सबंध नाही.