कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शाह यांच्या रॅलीत झालेल्या गोंधळात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्यात आला. मात्र, मोदी यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही की खेद व्यक्त केला नसल्याचे ममता म्हणाल्या.
ममता म्हणाल्या, की अमित शाह यांच्या रॅलीमुळे कोलकाता येथे हिंसाचार झाला. अमित शाह यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. या घटनेकडे बंगालचे नागरिक गंभीरतेने पाहत आहेत.
निवडणूक आयोग हे भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यामुळे मंगळवारी कोलकाता येथे हिंसाचार झाला. निवडणूक आयोगने त्यांच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस का जारी केली नाही? असेही ममता म्हणाल्या.
अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगाला धमकावले. त्याचाच हा परिणाम आहे का असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. मी मोदींविरोधात बोलत आहे म्हणून मला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप ममता यांनी केला.