कोलकाता - डॉक्टरांना मारहाणप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये गेल्या पाच दिवसांपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या सर्व मागण्या अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मान्य केल्या आहेत. तसेच, पत्रकार परिषद घेत त्यांनी डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहनही केले आहे. 'रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी असून याप्रकरणी लवकरच तोडगा काढला जाईल,' असे आश्वासन त्यांनी दिले.
'डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागण्या मान्य केल्याशिवाय बैठकीला हजर राहणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली. या संपामुळे गरीबांवर उपचार होऊ शकत नाहीत. कमीत कमी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु रहायला हव्यात. आम्ही राज्यात अत्यावश्यक सेवा प्रतिपाळ कायदा (ESMA - Essential Services Maintenance Act) लागू करु इच्छित नाही,' असे ममता म्हणाल्या. 'आम्ही एकाही व्यक्तीला अटक केलेली नाही. कोणतीही पोलिसी कारवाई केली जाणार नाही,' असेही त्या म्हणाल्या.
याआधी ममतांनी संपावर बसलेल्या डॉक्टरांना पत्र लिहित डॉक्टरांना लवकरात लवकर संप मिटवावा, असे आवाहन केले होते. कामावर रुजू झाल्यानंतर कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वासनही दिले होते. मात्र, याला डॉक्टर बधले नाहीत. त्यांनी प्रत्युत्तरादाखल ममता सरकारसमोर मागण्यांची यादी सादर केली. याशिवाय, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात संपावर असलेल्या डॉक्टरांनीही ममतांना ४८ तासांचा अल्टीमेटम दिला. 'मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, रविवारी १४ रुग्णालयात ओपीडी आणि सर्जरी बंद करणार आहोत,' असाही इशारा एम्सच्या डॉक्टरांनी दिला होता. तसेच, त्यांनी ममतांना माफी मागण्यास सांगितले. यानंतर रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या कारणावरून केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही ममतांना डॉक्टरांच्या संपाविषयी अहवाल मागवण्यात आला. यानंतर ममतांनी नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.
या होत्या डॉक्टरांच्या अटी
१. ममतांनी जखमी डॉक्टरांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल निषेध जाहीर केला पाहिजे.
२. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत: लवकरात लवकर हस्तक्षेप करावा.
३. सोमवारी रात्री डॉक्टरांना सुरक्षा पुरवताना पोलिसांच्या निष्क्रियेतेची न्यायालयीन चौकशी करावी.
४. हल्लेखोरांवर केलेल्या कारवाईची पूर्ण माहिती द्यावी.
५. राज्यात ज्युनिअर डॉक्टर आणि विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
६. सर्व वैद्यकीय महाविद्यालयात सशस्त्र बलाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.