नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत धडाकेबाज विजय मिळवत नरेंद्र मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. आज (गुरुवार) सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत इतर मंत्रीही शपथ घेणार आहेत. यामध्ये अमित शाह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, सुषमा स्वराज यांना महत्वाची कॅबिनेट मंत्रिपदे मिळणार आहेत.
अमित शाह
सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. परंतु, गांधीनगर येथून विजयी झाल्यानंतर त्यांची मंत्री पदासाठी चर्चा आहे. त्यांना पहिल्यांदा गृह मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. परंतु, अरुण जेटली यांनी आजारपणाचे कारण देत मंत्रीपद नाकारल्यामुळे अर्थमंत्री पदी त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
नितीन गडकरी
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन गडकरी यांनी २०१४ साली स्थापन झालेल्या सरकारामध्ये रस्ते वाहतुकमंत्री आणि जल संधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता, नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात सरकारात त्यांचीही रस्ते व वाहतूक मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
राजनाथ सिंह
भाजपमधील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सध्या केंद्रीय गृहमंत्री आहेत. परंतु, अमित शाह यांचे गृह मंत्रीपदासाठी चर्चा सुरू असल्यामुळे त्यांना दुसरे मंत्रीपद मिळण्याची शक्यता.
निर्मला सीतारमण
मनोहर पर्रिकर यांच्यानंतर संरक्षण खात्याच्या पहिल्या संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. राफेल मुद्यासह संरक्षण खात्यात अनेक महत्वाच्या मुद्यावर चांगली कामगिरी. आताही संरक्षण मंत्री पदी कायम राहण्याची शक्यता.
सुषमा स्वराज
भाजपमधील प्रमुख नेत्यांपैकी एक. सध्या परराष्ट्र मंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू सक्षमरित्या मांडली. चीन आणि पाकिस्तान विरोधात अनेक मुद्यावर भारताची बाजू व्यवस्थितरित्या मांडली. यावेळीही परराष्ट्र मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता.
प्रकाश जावडेकर
२०१४ साली भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पर्यावरण मंत्री म्हणून नियुक्ती. स्मृती इराणी यांच्यानंतर सध्या भाजप सरकारमध्ये मनुष्यबळ विकास मंत्री. नवीन सरकारामध्ये त्यांची दुसऱ्या खात्यात वर्णी लागण्याची शक्यता.
स्मृती इराणी
राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव केला. मागील कार्यकाळात मनुष्यबळ विकासमंत्री आणि वस्त्रोद्योग म्हणून काम पाहिले आहे. आता नवीन कार्यकाळात दुसरे खाते मिळण्याची शक्यता.