ठाणे - आरएसएसवाल्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. ही हत्या त्यावेळी काँग्रेसचे नेते थांबवू शकले नाहीत. आरएसएस तर काँग्रेसचीच पैदास असून त्यांच्याच ताब्यात काँग्रेस आजही आहे, असे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी भिवंडीतील एका जाहीर सभेत केले.
विशेष म्हणजे २०१४च्या निवडणुकीतील प्रचार सभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधींनी आरएसएसवाल्यांनी महात्मा गांधींना गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याचे विधान केले होते. या विधानावर भिवंडी आरएसएसचे कार्यवाहक राजेश कुंटे यांनी आक्षेप घेत, त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्या दाव्याची सुनावणी अद्यापही भिवंडी न्यायालयात सुरु आहे. असे असतानाच आमदार अबू आझमी यांनी महात्मा गांधींची हत्या आरएसएसने केल्याचे विधानाने पुन्हा भिवंडी लोकसभा मतदार संघात खळबळ उडवून दिली आहे.
भिवंडी लोकसभा निवडणूकित सपा-बसपा युतीचे उमेदवार डॉ. नुरुद्दीन अन्सारी यांच्या प्रचारासाठी भिवंडीतील दिवानशा दर्गा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार अबू आझमी यांनी खळबळजनक वक्त्यव्य केले. आझमी पुढे म्हणाले की, काँग्रेस सर्व देशभर मतांची विभागणी करून भाजपाला जिंवकविण्याचे काम करीत असून त्यामुळे खरे वोट कटवा काँग्रेस असून हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल, असे आरोप त्यांनी प्रचार सभेत केले. मात्र सभेदरम्यान भाजपा विरोधात त्यांनी अधिक बोलणं टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरएसएसचा जन्म काँग्रेस पक्षाने केला. त्यामुळे त्यांच्याच बोलण्यावरून आताची काँग्रेस कार्य करीत असून काँग्रेसला लगाम घालण्याचे काम समाजवादी विचारांच्या पक्षाने केले असल्याचे सांगत, काँग्रेस उत्तरप्रदेश, दिल्ली , पश्चिम बंगालयांसह अनेक राज्यात तेथील निधर्मी पक्षांची मते खाण्यासाठी उभी असल्याने खरे वोट कटवाची भूमिका काँग्रेस वाढवीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या विधानावर बोलताना त्यांनी केलेले विधान हे स्वस्त प्रसिद्धीसाठी केले आहे. समाजवादी पक्ष आतंकवादकडे आतंकवाद म्हणूनच बघते, त्यास कोणत्या धर्माचे रंग देणे चुकीचे असून महात्मा गांधी यांची हत्या कारणाची आणि वसई मधून पकडलेल्या अभिनव भारत व सनातनच्या पकडल्या गेलेल्या आरोपींची जात तपासली तर मोदींचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल असा आरोपही त्यांनी केला.