नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगडमधील बांसा गाव येथे दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आझमगडच्या बॉर्डरवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी डॉ. नितीन राऊत यांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आझमगडच्या सीमेवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली असून त्यांना नजरकैद केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या आडमुठे धोरणाला न जुमानता डॉ.नितीन राऊत त्या ठिकाणी रस्त्यावर खाली बसून शांततेच्या मार्गाने ह्या कृत्याचा विरोध करत आहेत.
दरम्यान, नितीन राऊत आज सकाळी उत्तर प्रदेशमधील वाराणसी विमानतळावर पोहचले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी योगी सरकारवर निशाण साधला. उत्तर प्रदेशमध्ये दलितांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. हे मी म्हणत नाही, तर एनसीआरबी अहवालही हेच सांगतो. अहवालानुसार राज्यात योगी सरकार विराजमान झाल्यानंतर हजारो दलित लोकांची हत्या झाली आहे. दलित स्त्रीयांवरही अत्याचार झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.
आज दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या कार्यकाळात दलितांवर अत्याचाराच्या घटना घडत, तेव्हा त्यांनी 1990 कायदा केला होता. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये या कायद्याचे पालन होत नाही. दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांच्या हत्येचा मी निषेध दर्शवतो, असे ते म्हणाले.