हैदराबाद - देशभरामध्ये 750पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे संकेत येत असतानाच केरळ, महाराष्ट्र आणि तेलंगाणामधून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या तीनही राज्यात मिळून 77 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीती पसरली आहे.
77 पैकी 39 केरळमध्ये, 10 तेलंगाणात आणि 28 महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. वाढलेल्या रुग्णांमुळे तेलंगाणात एकून रुग्ण संख्या 59 झाली आहे. तर केरळमध्ये 176 जण कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यातील 12 जण पूर्णत: बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 153वर पोहचला आहे.
देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण 750पेक्षा जास्त झाले आहेत. तर हजारो नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार देशभर झाला असून सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळून आले आहेत. अशा परिस्थितीतही सकारात्मक बातमी म्हणजे 67 नागरिक पूर्णत: बरे झाले आहेत. देशभरात कर्फ्यू लागू केल्यानंतर नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. सर्व देशात 21 दिवस लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे.