नवी दिल्ली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समीत ठक्कर या तरुणाला अटक केली आहे. यावर उत्तर प्रदेशमधील पिलीभीतचे भाजपा खासदार वरुण गांधी यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सरकारने समीत ठक्कर या तरुणावर केलेली कारवाई, ही बेकायदेशीर असून लोकाशाहीसाठी घातक आहे, अशी टीका त्यांनी केली.
हे पूर्णपणे अमानुष, बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. लोकशाहीमध्ये संवाद बळकट करण्यासाठी राजकीय विरोध होऊ शकतो. प्रत्येकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला प्राण्यासारखी वागणूक देणे, हे राष्ट्राला कमजोर करते. अशा कारवायामुळे लोकशाहीला धोका असून ही निरंकुशपणा आणि फॅसिझमची पुनरावृत्ती आहे, असे वरुण गांधी म्हणाले.
काय प्रकरण ?
समीत ठक्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी नागपूर पोलिसांनी आज (24 ऑक्टोबर) अटक केली आहे. युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समीत ठक्कर विरोधात तक्रार केली होती. आरोपी समीत हा भाजपाच्या आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. बी.कॉमचे शिक्षण घेतलेला 32 वर्षीय समीत ठक्कर ट्विटरवर सक्रिय आहे. त्याचे ट्विटरवर 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांचा समावेश आहे.