चंदीगढ : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या जिंदमध्ये बुधवारी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महापंचायतील भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकैतही या महापंचायतीला हजर राहणार आहेत.
हरियाणातील सर्व शेतकऱ्यांना बोलावले..
मिळालेल्या माहितीनुसार, जिंदच्या कांडेला गावामध्ये ही महापंचायत होणार आहे. टिकैत यांच्यासह बीकेयूचे सरचिटणीस युधवीर सिंग, उपाध्यक्ष रामफल कांडेला आणि इतर शेतकरी नेतेही या महापंचायतीला उपस्थित असणार आहेत. या पंचायतीसाठी पंचकुला, अंबाला, यमुनानगर, कुरुक्षेत्र, कैठल, फतेहबाद, सिरसा, कर्नाल, पानीपत, भिवानी, सोनिपत, झज्जार, दादरी आणि हरियाणाच्या इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाही या महापंचायतीसाठी बोलावण्यात आले आहे.
सरकारच्या दडपशाहीविरोधात महापंचायत..
हरियाणामध्ये लागू करण्यात आलेले इंटरनेट बॅन, आणि सरकारच्या दडपशाही विरोधात शेतकरी संघटनांनी सहा फेब्रुवारीला देशभरात 'चक्का जाम'ची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर आता या महापंचायतीबाबत माहिती देण्यात आली. यापूर्वीही राज्यात अनेक ठिकाणी अशा महापंचायत आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यानंतर हरियाणातून हजारो शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलनासाठी रवाना झाले होते.
दरम्यान, दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सिमेंट बॅरिअर आणि तारेची कुंपणे लावण्यात आली आहेत. यामुळे दिल्लीच्या सीमांना लष्करी छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
हेही वाचा : संरक्षण क्षेत्रासाठी भारत इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही - राजनाथ सिंह