कोची - 'महाबली बेडूक' हा केरळचा अधिकृत उभयचर प्राणी म्हणून घोषित केला जाणार आहे. पश्चिम घाट परिसरात ही दुर्मीळ प्रजाती आढळून येते. राज्य सरकारच्या संमतीनुसार महाबली बेडकाला लवकरच अधिकृत उभयचर प्राणी म्हणून घोषित केले जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्याने दिली.
'या संदर्भातील प्रस्ताव तयार असून राज्य सरकारच्या संमतीनंतर लवकरच महाबली बेडकाला केरळचा अधिकृत उभयचर प्राणी म्हणून घोषित केले जाईल', अशी माहिती मुख्य वाईल्डलाईफ वॉर्डन सुरेंद्रकुमार यांनी दिली. स्टेट वाईल्डलाईफ बोर्डाच्या आगामी बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा होईल, असेही ते म्हणाले.
कसा लागला शोध? -
दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक एस.डी.बीजू यांनी बेडकाच्या या प्रजातीचा शोध लावला होता. काही वर्षांपूर्वी इडुक्की जिल्ह्यात त्यांनी महाबली बेडकाच्या प्रजातीचा शोध लावला. हा केवळ दुर्मीळ बेडूक नसून एकमेवाद्वितीय अशी प्रजाती आहे, असे बीजू यांनी सांगितले. जवळपास वर्षभर जमिनीच्या आत असणारा महाबली बेडूक हा केरळ आणि त्यातही पश्चिम घाटांत आढळतो. तामिळनाडूतील एका वनविभागाच्या परिसरातही हा बेडूक आढळला असल्याचे ते म्हणाले.
असा असतो महाबली -
महाबली अर्थात पर्पल बेडुकाला वैज्ञानिक भाषेत 'नसिकाबट्राचूस साह्यड्रेन्सिस' असेही संबोधले जाते. महाबली बेडूक ही अत्यंत दुर्मीळ प्रजाती आहे. अशी प्रजाती शतकांतून एकदाच आढळते, असे 'डब्ल्यूडब्ल्यूएफ' या संस्थेने म्हटले आहे. महाबली बेडूक अंदाजे ७ सेंटिमीटर एवढे असते. संपूर्ण शरिराच्या तुलनेत या बेडकाचे डोके छोटे असते. इतर बेडकांच्या तुलनेत महाबलीचे पाय छोटे असतात, असेही 'डब्ल्यूडब्ल्यूएफ'ने सांगितले आहे.
संदीप दास यांचा पुढाकार -
महाबली अर्थात पर्पल बेडकाला राज्यातील अधिकृत उभयचर प्राणी घोषित करण्यासंदर्भातील प्रस्ताव वनविभागात जमा करण्यात आला आहे. 'केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट'मध्ये बेडकांवर संशोधन करणाऱ्या संदीप दास यांनी हा प्रस्ताव दिला आहे. लंडनमधील 'झुऑलॉजिकल सोसायटी' येथे 'फेलो' म्हणून कार्यरत असलेले दास यांनीच हा बेडकाचे नामकरण 'महाबली फ्रॉग' असे केले आहे. केवळ एका दिवसासाठी जमिनीच्या आत राहणारा हा बेडूक जमिनीवर दिसून येतो. त्यामुळे बेडकाचे नाव 'महाबली' ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये महाबली राजाची एक दंतकथा प्रसिद्ध आहे. यावरूनच बेडकाचे नाव महाबली असे ठेवण्यात आले आहे.
राज्यातील उभयचर प्राण्यांमध्ये महाबली हा बलदंड बेडूक आहे. त्यामुळे महाबली सर्वात प्रसिद्ध बेडूक ठरत असल्याचे दास म्हणाले. महाबली बेडूक उभयचरांचा 'ब्रँड अॅम्बेसेडर' ठरू शकतो. यामुळे केरळमधील पश्चिम घाटात या बेडकांचे संवर्धन होऊ शकेल, असेही दास यांनी सांगितले.