उज्जैन (म. प.)- उज्जैनमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या २ आमदारांना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील परप्रांतीय श्रमिकांची होत असलेली हाल-अपेष्टा दाखवून देण्यासाठी या दोघा आमदारांनी आपल्या समर्थकांसह महाकाल मंदिरापासून पदयात्रा काढली होती. मात्र, त्याना अटक करण्यात आली.
तराणा येथील आमदार महेश परमार आणि आलोट येथील आमदार मनोज चावला असे अटक करण्यात आलेल्या काँग्रसच्या २ आमदारांची नावे आहेत. पदयात्रा सुरू होताच या दोघा आमदारांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लॉकडाऊनदरम्यान, पदयात्रा व इतर क्रियांवर बंदी आहेत. पदयात्रा काढल्या प्रकरणी दोन्ही काँग्रेस आमदारांवर कलम १५१नुसार जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती उज्जैनचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक रुपेश कुमार द्विवेदी यांनी दिली.
दरम्यान, यावर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे आमदार महेश परमार यांनी, आपण शांतीपूर्ण पदयात्रा काढली होती. श्रमिकांना होत असलेल्या समस्यांवर सरकारचे लक्ष वेधने हा या यात्रे मागचा उद्देश होता, असे सांगितले.
हेही वाचा-पंतप्रधानांची २० लाख कोटींची घोषणा म्हणजे केवळ पोकळ आश्वासन - जयवीर शेरगिल