नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जंगपुरा भागात चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. घराबाहेर पार्क केलेल्या आलिशान वाहनांचे एलॉय व्हिलसहीत फक्त चाके चोरट्यांनी पळवून नेले आहेत. गाड्या मात्र, जशाच तशा वीटेच्या आधारावर उभ्या आहेत.
दिल्लीमध्ये पार्किंगची अडचण तर सर्वश्रुत आहे. एकूण वाहन संख्येच्या निम्म्याच गाड्यांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक जण घराच्या बाहेर किंवा जागा मिळेल तेथे गाडी पार्क करतात. दिल्लीतील जंगपुरा परिसरातही हीच परिस्थिती आहे. आज सकाळी मालक गाडी पाहतात तर काय, सर्व गाड्या चाकांऐवजी वीटांवर उभ्या होत्या. एलॉय व्हिलसहीत चारही चाकांची चोरी झाली होती. हा अजब प्रकार पाहून कार मालकांमध्ये गोंधळ उडाला.
चाके चोरणाऱ्या टोळीचा पराक्रम
गाड्यांची चाके चोरीला जाण्याची दिल्लीतील ही पहिली घटना नाही. याआधीही दिल्लीत गाड्यांची चाके चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गाड्या चोरी न करता फक्त चाके चोरी करणारी टोळी दिल्लीत सक्रिय आहे. या टोळ्या चाकांची भंगारात विक्री करतात असे पोलीस अधिकारीही दबक्या आवाजात म्हणत आहेत.