पटणा - अवकाळी पावसामुळे राज्यात आणि देशात इतरत्रही अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या पिकावरही पावसाने पाणी फेरल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात अनेक शहरांमध्ये कांद्याचे भाव ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. आजही कांद्याचे भाव बाजारात 80 ते 100 रुपये किलो झाले आहेत. मात्र, बिहारमधील पटणा येथील बिहार स्टेट को-ऑपरेटिव मार्केटिंग यूनियन लिमिटेड येथे कांदा 35 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.
हेही वाचा - JNU आंदोलन: रस्त्यावर बसून अभ्यास करत विद्यार्थ्यांचा मोर्चा
अवकाळी पावसामुळे देशभरात कांद्याचे भाव कडाडले आहेत. 30 ते 40 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 80 ते 100 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी कांदा खाणेच बंद केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बिहारमधील पटणा येथील बिहार स्टेट को-ऑपरेटिव मार्केटिंग यूनियन लिमिटेड बाजारात हाच कांदा 35 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. त्यामुळे सकाळी सकाळीच ग्राहकांना या दुकानात कांदा खरेदीसाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या आधीही कांदा महाग झाला होता तेव्हा या बाजारात कांदा स्वस्त दराने विकला होता. त्यावेळी कांदा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊन दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळेच आता येथे बाजार समितीचे कर्मचारी हेल्मेट घालून कांद्याची विक्री करत आहेत.