जिनिव्हा - लॉकडाऊनमुळे असंघटीत क्षेत्रातील कामगारांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे जागतिक कामगार संघटनेने म्हटले आहे. कमी उत्पन्न गट असणाऱ्या देशांमध्ये तर ही परिस्थिती गंभीर बनत चालल्याचे संघटनेने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
जास्त उत्पन्न गट असलेल्या देशांमध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगारांची गरीबी ५२ टक्क्यांनी कमी होणार असल्याचे म्हटले आहे. तर उच्च उत्पन्न गट असलेल्या देशात २१ टक्क्यांनी गरीबी वाढणार असल्याचे आयएलओने म्हटले आहे. जगभरातील २०० कोटी असंघटीत क्षेत्रातील कामगारांपैकी १६० कोटी कामगार लॉकडाऊनमुळे अडचणीत आले आहेत.
ज्या क्षेत्रांवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे तेथील कामगार आणि लहान उद्योगांमधील असंघटीत कामगार सर्वात जास्त भरडला गेला आहे. महिलांवरही लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे. या सर्व गरिबीत ढकललेल्या कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांचेही पोट भरायचे आहे, म्हणून अनेक देशांमध्ये लॉकडाऊन यशस्वी राबविला गेला नाही, असे पत्रकात म्हटले आहे.
ज्या देशांमध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगार आणि उद्योगधंदे आहेत. त्या देशांमध्ये येत्या काळात सामाजिक तणाव पाहायला मिळेल. ७५ टक्के असंघटीत क्षेत्रातील उद्योगधंद्यात १० पेक्षा कमी कामगार आहेत. त्या सर्वांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्याने सर्वात जास्त हाल त्यांचे होत आहेत, असे जागतिक कामगार संघटनेने म्हटले आहे.