श्रीनगर - सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे आपल्या घरापासून दूर अडकलेले लोक घरी जाण्यासाठी नाना प्रयत्न करत आहेत. जम्मू काश्मीरच्या पूंछमधील एका पठ्ठ्याने तर कहरच केला. अॅम्ब्युलन्समधून घरी जाता यावे, यासाठी त्याने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला.
हकाम दिन असे या व्यक्तीचे नाव आहे. मागील आठवड्यात जखमी झाल्यामुळे त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, आणखी तीन व्यक्तींसोबत मिळून त्याने हा कट रचला, जेणेकरून अॅम्ब्युलन्समधून त्याला आपल्या घरी जाता येईल.
मात्र, त्याच्या घरापासून काही किलोमीटर दूर असतानाच पोलीस चेक नाक्यावर त्यांचे हे बिंग फुटले. बुफ्लिअॅझ चेक नाक्याजवळ पोलिसांनी या रुग्णवाहिकेची तपासणी केली, तेव्हा आतमध्ये कोणताही मृतदेह नसल्याचे त्यांना दिसून आले.
या चौघांवरही आता गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा : व्हिसा नियम मोडणारे परदेशी नागरिक आता थेट काळ्या यादीत