चंदीगड - देशामध्ये कोरोनाने दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता हरियाणा सरकारने राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फरीदाबाद, गुरुग्राम, रोहतक, झज्जर,सोनीपत,पानीपत,पंचकूला या 7 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार आहे. संबधित जिल्ह्यांमध्ये वीज, पाणी, किराणा दुकान अशा अत्यावश्यक सेवा सुरुच ठेवण्यात येणार आहेत. 'कोरोनाविरोधात आपण एक लढाई लढत असून आपला विजय नक्की आहे. त्यामुळे लॉकडाउनला घाबरण्याची गरज नाही', असे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले.
दरम्यान, रविवारी देशभरामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात आला असून हरियाणाध्ये जनता कर्फ्यूची वेळ उद्या (सोमवार) सकाळी सात वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 340 पेक्षा अधिक झाली असून कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना व्हायरस हे अवघ्या जगाचं संकट बनल्याचं चित्रं आहे. त्यामुळे प्रत्येकानं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.