नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने आयात बंदी घालण्यात आलेल्या १०१ लष्करी वस्तूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) एमके आय ए, लँड-अटॅक क्रूज मिसाईल (लॉंग रेंज) आणि १५५ मिमी आर्टिलरी अॅमो यांच्यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे. ही बंदी २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येईल. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशामध्येच या वस्तू बनवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये, जो डिसेंबर २०२०पासून अमलात आणला जाईल - विविध रायफल, बंदूका, शॉर्ट रेंज सर्फेस टू एअर मिसाईल, क्रूज मिसाईल, रॉकेट लॉंचर, टँक सिम्युलेटर्स, रेडार, बुलेटप्रूफ जॅकेट, बॅलेस्टिक हेल्मेट, क्षेपणास्त्र विध्वंसक, मोठ्या जहाजांसाठीचे सोनार सिस्टम, अँटी-सबमरीन रॉकेट लॉंचर, शिपबोर्न मिडीयम रेंज गन, २५०-५०० किलोदरम्यानचे बॉम्ब, रेडार वॉर्निंग रिसिव्हर, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, सॅटेलाईल टर्मिनल यांसह इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.
तर, डिसेंबर २०२१पासून अमलात आणण्यात येणाऱ्या टप्प्यामध्ये व्हील्ड आर्मर फायटिंग व्हेईकल, लाईट मशीन गन, माईन्स, मल्टिपर्पज ग्रेनेड्स आणि यासंबंधी इतर गोष्टींची आयात थांबवण्यात येणार आहे. ४० एमएम अंडर बॅरल ग्रेनेड लॉंचर, लाईटवेट रॉकेट लॉंचर आणि इतर काही वस्तू २०२२ च्या डिसेंबरनंतर आयात होणार नाहीत.
२०२३नंतर ग्रँड बीएम रॉकेट, अस्त्र-एमके वन एअर टू एअर मिसाईल, जीएसएटी-७सी कम्युनिकेशन सॅटेलाईल, बेसिक ट्रेनर एअरक्राफ्ट इत्यादी गोष्टींची आयात थांबवण्यात येणार आहे. तर लहान जेट इंजिन, क्लोज इन वेपन सिस्टिम, बाय-मॉड्युलर चार्ज सिस्टिम अशा प्रकारच्या गोष्टींची आयात २०२४च्या डिसेंबरनंतर थांबवण्यात येणार आहे.
लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रूज मिसाईल या डिसेंबर २०२५नंतर आयात केल्या जाणार नाहीत, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.