पणजी- कोरोना विषाणूचे संसर्ग टाळण्यासाठी गोवा सरकारने आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वप्रकारची वाहतूक ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कार आणि मोटरसायकल यांचे परवानेही आज रात्रीपासून निलंबित करण्यात येतील, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सावंत म्हणाले, आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात असून तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आज राज्यातील सर्व विभागाच्या खाते प्रमुखांची बैठक घेण्यात आली होती. तसेच राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. यासाठी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, म.गो, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सरकारला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अत्यावश्यक शासकीय कामाखेरीज लोकांनी सरकारी कार्यालयात ३१ मार्च पर्यंत येण्याचे टाळावे. सरकार दरबारी असलेली गाऱ्हाणी या काळात स्थगित करण्यात आली आहे.
कदंब महामंडळास आंतरराज्य वाहतूक कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर, ग्रंथालये आणि संग्रहालये बंद करण्यात आली आहेत. स्थानिक औषध निर्मात्यांना सॅनिटायझर सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील डिस्टिलरीज यांनी सॅनिटायझरचे उत्पादन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्यूसाठी खाजगी उद्योजकांनी उद्योग बंद ठेवावेत. शक्य झाल्यास ३१ मार्चपर्यंत बंद ठेवावेत. तसेच या काळात कर्मचाऱ्यांचा पगार कपात करू नये. आवश्यकता भासल्यास टास्क फोर्स तयार केले जाईल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्युसाठी सर्वच लोकांनी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत घराबाहेर पडू नये. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांनीच घराबाहेर पडावे. या काळात रुग्ण सेवा देण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करावे. गरज नसेल तर गोव्याबाहेर जाऊ नये. तसेच सुट्टी समजून गोव्यातही फिरू नये. या काळात सर्व धर्मियांनी धार्मिक कार्यक्रम टाळावेत. त्याबरोबरच, आरोग्य संचालनालयाद्वारे वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
हेही वाचा- माओवादी अन् सुरक्षा दलात चकमक, सुरक्षा दलाचे 8 जवान जखमी