श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामधून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला शनिवारी अटक करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलीस, ३२ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या ९२ बटालियनने संयुक्तपणे ही कामगिरी केली. या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवाद्याचे नाव अकील अहमद पार्रे आहे. तो हंदवाडामधील मंडिगाम क्रालगुंड येथील रहिवासी होता. सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सीआरपीएफ, काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सने हंदवाडाच्या या भागात शनिवारी शोधमोहीम राबवली होती. यावेळी शोधपथकाला पाहताच एका व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
त्याला पकडल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. पोलिसांना त्याच्याकडे शस्त्रास्त्रे, काडतूसे आणि स्फोटक पदार्थ आढळून आले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे कबूल केले. यानंतर त्याच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : कुख्यात गुंड विकास दुबेचं घर पाडलंच नाही, उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा