इंदूर - प्रसिद्ध शायर, कवी, आणि गीतकार डॉ. राहत इंदौरी यांचे कोरोनाने निधन झाले. मंगळवारी सकाळीच त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. इंदूरमधील अरबिंदो रुग्णालयात वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना नियमांनुसार त्यांच्या मृतदेहावर इंदूरमधील छोटी खजरानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा राहत आणि चार मुले, असा परिवार आहे.
इंदौरी यांना हृदयविकाराचा झटका अल्याने त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली. त्यांचा मृतदेह अरबिंदो रुग्णालयातून रुग्णवाहिकेने स्मशानभूमीत आणण्यात आला. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
राहत इंदौरी हे उर्दू कवितेच्या शैलीतील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि बॉलिवूडमधील अनेक गाण्यांसाठीही त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी मुन्ना भाई एम.बी.बी.एस., मर्डर आणि इतर चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत.