देहराडून - राज्यामध्ये पावसाने जोर धरला असून बद्रीनाथ यात्रा विस्कळीत झाली आहे. हिमालयातील बद्रीनाथकडे जाणाऱ्या महामार्गावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने लांबगड भागामध्ये दरड कोसळली आहे. आज (शनिवारी) रस्ता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
दरड कोसळल्यामुळे सुमारे २०० भाविक बद्रीनाथमध्ये अडकून पडले आहेत. तर बद्रीनाथकडे निघालेल्या ८०० भाविकांनी रस्ता बंद असल्याने गोविंदघाट येथील गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे. पावसामुळे मलबा बाजूला काढण्यास वेळ लागू शकतो, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
धार्मिक उत्सवाच्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये कमालाची वाढ झाली आहे. यावर्षी चारधाम यात्रा करण्याचा आकडा १५ हजारांवर गेला आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार ठिकाणांच्या धार्मिक स्थळांना चारधाम म्हटले जाते. पावसाळ्यामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. यामुळे यात्रेकरुंची सुरक्षितता धोक्यात येते.