नवी दिल्ली - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढून खासगी वार्डामध्ये हलवण्यात आले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या हृदयविकार अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत आहे.
श्वास घेण्यास त्रास नाही -
लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या फुफ्फसांचे काम आता सामान्यपणे सुरू आहे. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत नाही, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. एम्स रुग्णालयातील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. राकेश यादव यांच्या नेतृत्त्वाखालील पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. डॉ. राकेश यादव यांनी या आधीही लालूंवर उपचार केले आहेत.
एअर अॅम्ब्युलन्सने आणले होते दिल्लीत -
झारखंडमधील रिम्स रुग्णालयात लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला हलवण्यात आले होते. दिल्लीला आणतेवेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य होते. लालू प्रसाद यादव यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली असून त्यांची किडनी फक्त २५ टक्के काम करत होती. निमोनिया आजारनेही ते ग्रस्त आहेत. श्वास घेण्यासही त्रास होत आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना हवाई अॅम्युलन्सने दिल्लीला हलवण्यात आले, अशी माहिती मुलगा आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली होती.
चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा -
मागील काही वर्षांपासून लालू प्रसाद यादव यांची प्रकृती नाजूक झाली असून रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. चारा घोटाळा प्रकरणी ते सध्या तुरुंगात असून प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा मुक्काम रुग्णालयातच आहे. २०१८ सालीही प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, सुमारे एक महिन्याने डिस्चार्ज देण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीवेळीही ते रुग्णालयात होते. तेथूनच ते राज्यातील घडामोडींची माहिती घेत होते.