लखनऊ - मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लखनऊमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी नियंत्रणात असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज (बुधवारी) सांगितले आहे. राज्यपाल 10 दिवसांच्या सुट्टीवर असून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी गेले होते. मात्र, तेथे गेल्यावर आजारी पडले.
लालजी टंडन 86 वर्षांचे आहेत. श्वास घेण्यास त्रास, ताप तसेच मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाल्याने त्यांना लखनऊमधील मेधान्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृती सुधारण्यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत. प्रकृती गंभीर असली तरी, नियंत्रणात असल्याचे रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले.
सध्या त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज्यपालांची कोरोना चाचणीही घेण्यात आली. मात्र, अहवाल निगेटिव्ह आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही रुग्णालयात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.