जयपूर - देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे परराज्यातील मजूर पायीच प्रवास करत घर गाठण्याचा प्रयत्न करत आहे. कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्याचे सरकार घरवापसीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मजूर अडाणी आहेत. त्यांना फेसुबक, ट्विटरचा वापर करता येत नाही. इतकेच नाहीतर ते आपला व्हिडिओ बनवून सरकारला पाठवू शकत नाही. त्यामुळे ४० डिग्री तापमानामध्ये ते पायीच प्रवास करत आपले घर गाठत आहेत.
हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यामधील एकाच कुटुंबातील १२ ते १३ मजूर आपल्या लहान मुलांना घरी ठेवून बिकानेर येथे हरभरा कापणीसाठी आले होते. त्यांचे काम संपले आणि देशात लॉकडाऊन सुरू झाले. सर्व वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे घरी जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. तसेच इथं खायला अन्नही नव्हते. त्यामुळे ते ३०० किलोमीटर पायी प्रवास करत बिकानेर येथून सरदारशहरमध्य पोहोचले. गेल्या ७ दिवसांपासून ते पायी चालत प्रवास करत आहेत. त्यांना आणखी ३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा आहे. मात्र, चालून चालून पाय दुखतात. पायातून रक्त येत आहे. त्यात ४० डिग्री तापमान आहे. त्यामुळे पुढचा ३०० किलोमीटरचा प्रवास कसा होणार? याची चिंता त्यांना लागली आहे.
अनेकजण रस्त्यात अन्नवाटप करतात. त्यामुळे खाण्या-पिण्याचा त्रास झाला नाही. मात्र, पाय दुखत असल्याने चालायची इच्छा होत नाही. घरी लहान मुलं असल्याने थांबू पण शकत नाही. त्यामुळे पुन्हा चालत चालत पुढील प्रवास करत असतो, असे मजुरांनी सांगितले.
राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यातील सरकारने घरी पोहोचवण्याची सुविधा केली. त्याचप्रमाणे आमचे सरकार देखील आमच्यासाठी घरी जाण्याची सुविधा करतील, अशी अपेक्षा या मजुरांनी व्यक्त केली आहे.