बंगळूरु - हम्पी एक्सेप्रेसने नीटची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना रेल्वे उशिरा पोहोचल्याने परीक्षेला मुकावे लागले. हम्पी एक्सप्रेस वेळेपेक्षा तब्बल ६ तास उशिरा निघाली. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणाऱ्या 'नीट' परीक्षेला मुकावे लागले. यामुळे विद्यार्थी वर्गासह पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
हम्पी एक्सप्रेस (गाडी नं १६५९१) ही गाडी उत्तर कर्नाटकमधून बंगलुरुला २.३० वाजता पोहचली. मात्र, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना १.३० वाजता हजर रहावे लागणार होते. त्यामुळे एक तास उशिर झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेला मुकावे लागले.
याप्रकारानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याचा खेद व्यक्त केला. त्यांनी मानव विकास संसाधन मंत्रालयाला एक पत्र लिहीत रेल्वेमुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दारामय्या यांनी याविषयावरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या प्रकरणाची जबाबदारी घ्यावी, असेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.
वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी नीटची परीक्षा महत्वाची असते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नीटच्या परीक्षेला महत्वाचे स्थान आहे. काल रविवारी ओडिशा सोडून देशभरात ही परीक्षा २ ते ५ या वेळेत घेण्यात आली. ओडिशामध्ये 'फॅनी'ने हाहाकार माजवल्याने या राज्यात परीक्षा नंतर घेण्यात येणार आहे.