जयपूर : राजस्थानच्या कोटामधील चंबळ नदीमध्ये नाव पलटून झालेल्या दुर्घटनेत १३ लोकांचा मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या बोटीतून ३२ भाविक कमलेश्वर धामचे दर्शन करण्यासाठी जात होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोटीमध्ये बरेच साहित्य तसेच दुचाक्याही भरण्यात आल्या होत्या, ज्यामुळे ही बोट बुडाली.
यामध्ये बुधवारी ११ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना आणि बचाव पथकाला यश मिळाले होते. दोन अल्पवयीन मुलींचा शोध रात्रीही सुरू होता. १३ वर्षांच्या किशोरी अलका आणि १४ वर्षांच्या ज्योती बरनाहली यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी मिळाले. बोट ज्याठिकाणी बुडाली, तेथून जवळपास दीड किलोमीटरवर हे मृतदेह आढळून आले आहेत.
पोलीस उपअधीक्षक शुभकरण खींची यांनी दिलेल्या माहितीनुसार आता कोणीही बेपत्ता नाहीये. एकूण ३२ प्रवाशांपैकी १९ जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर, १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, शोधमोहीम थांबवण्यात आली आहे.
हेही वाचा : श्रीनगरमध्ये चकमक : तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, दोन जवान जखमी