कोलकाता - वर्ष 2019 अखेर 490 वर्षे चाललेल्या जुन्या वादाचा शेवट झाला. अयोध्येमधील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले जाईल आणि सुन्नी वक्फ बोर्डाला दुसरी मशीद उभारण्यासाठी पाच एकर जमीन दिली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय झाल्यापासून आठ महिने उलटून गेले आहेत. यावर्षी कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे अनेक बदल झाले आहेत. परंतु, राम मंदिर बांधण्याच्या प्रयत्नांना कोणताही ब्रेक लागलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला राम मंदिराचा शिलान्यास होणार आहे. याची जोरदार तयारी चालू आहे. मात्र, या सगळ्यामागे मूक इतिहासाची प्रतीक्षा आहे. यापैकी, कोलकाताच्या बुरबाबाजार भागातील दोन भावांची कहाणी सांगणारा इतिहास. अयोध्येच्या गल्ली-बोळातील कहाणी. राम कुमार आणि शरदकुमार कोठारी यांची कहाणी...
2 नोव्हेंबर, 1990. तीस वर्षे झाली. पण, पौर्णिमा कोठारींसाठी मात्र ही नुकतीच कालची घटना आहे. 1990 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात परत भूतकाळात डोकावून पाहताना पौर्णिमा म्हणाल्या, 'या कारणासाठी, ध्येयासाठी माझे राम कुमार आणि शरद कुमार यांनी त्यांचे जीवन अर्पण केले, ते अखेर घडून आले आहे.'
काय घडले होते?
विश्व हिंदू परिषदेने सप्टेंबर 1990 मध्ये राम मंदिर 'आंदोलना'ची हाक दिली होती. यामध्ये सर्वांना भाग घेण्यासाठी आवाहन केले होते. 15 सप्टेंबरला गुजरातमधील सोमनाथ मंदिरातून रॅलीला प्रारंभ होणार होता. याला भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचे समर्थन दिले होते. ही बाब हळूहळू देशातील प्रत्येक गावात चर्चेचा विषय बनू लागली होती. कोलकाताच्या कोठारी कुटुंबातील दोन भाऊ मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी घरातून निघाले होते.
राम कुमार कोठारी (वय 22) आणि शरदकुमार कोठारी (वय 20) यांनी त्यांचे वडील हिरालाल यांना मिरवणुकीत सामील होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. सुरुवातीला वडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांची मुलगी पौर्णिमा हिचे दोन आठवड्यात लग्न होणार होते. सर्व तयारी झाली होती. पण अखेरीस हिरालाल यांनी आपल्या मुलांच्या इच्छेपुढे मान झुकवली आणि दोघे बंधू 22 ऑक्टोबरला अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले.
उत्तर प्रदेश सरकार अयोध्येत प्रवेश करणारे आणि तेथून बाहेर पडणारे सर्व रस्ते, रेल्वे यांच्यावर नजर ठेवून नियंत्रित करत होते. त्यामुळे कारसेवकांनी वाराणसीमार्गे जाणारे अनेक पर्यायी मार्ग घेतले. 30 ऑक्टोबरला हिंदू पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राम कुमार आणि त्याचा भाऊ अयोध्येत पोहोचले. कारसेवक हनुमान गढी येथे जमले होते आणि वादग्रस्त जागेकडे निघाले. दोघे कोठारी बंधू सर्वांच्या पुढे होते. पोलिसांना ही मिरवणूक थांबवायची होती. पौर्णिमा म्हणतात की, 2 नोव्हेंबर रोजी जे घडले त्याची सुरुवात 30 ऑक्टोबर 1990 लाच झाली होती.
'ती गल्ली'
“30 ऑक्टोबरच्या मिरवणुकीत माझ्या भावांचा भगवा ध्वज हातात घेऊन जाण्याचा अट्टाहास होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना लक्ष्य केले. 2 नोव्हेंबरला राम आणि शरद हनुमान गढीजवळच्या गल्लीत भजन गात होते. पोलिसांनी येऊन त्यांना परिसर मोकळा करण्याचे आदेश दिले. यानंतर येथे भांडण सुरू झाले आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. मग पोलिसांकडून सर्वांवर गोळीबार करण्यात आला. माझ्या भावांनी इतर कारसेवकांसह जवळच्या मंदिरात आश्रय घेतला होता. जेव्हा तेथून कोणीतरी पाण्यासाठी हाक मारली तेव्हा ते सर्व तेथे लपून बसले होते. सर्वांना वाटले की, कोणीतरी सहकारी कारसेवक संकटात आहे. शरदने मंदिराचा दरवाजा उघडला तेव्हा पोलिसांनी त्याला मंदिराबाहेर ओढून घेतले. लवकरच त्याला गोळ्या घालण्यात आल्या आणि त्याला गल्लीतून खेचत नेले गेले. आपल्या भावाचे काय झाले, हे पाहण्यासाठी राम बाहेर आला आणि पोलिसांनी त्यालाही गोळ्या घातल्या. त्या दिवशी पोलिसांच्या गोळीबारात 16 कारसेवक हुतात्मा झाले. त्या दिवशी माझे दोघे भाऊ आम्हाला सोडून गेले,' असे पौर्णिमाने सांगितले.
हनुमान गढीजवळील त्या गल्लीत माझ्या भावांचे मृतदेह सापडले. अयोध्येच्या त्या गल्लीला अजूनही ‘हुतात्म्यांची गल्ली’ म्हणून ओळखले जाते.
विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिर ट्रस्टने राम मंदिराच्या शिलान्यास सोहळ्यासाठी आपल्याला आमंत्रित केले आहे, असे पौर्णिमा म्हणाल्या. 'बऱ्याच वर्षानंतर आणि माझ्या भावांचे जे काही झाले, त्यानंतर मी अयोध्येत त्यांचे प्रतिनिधित्व करेन, याचा मला मला खूप आनंद होत आहे,' असे त्या म्हणाल्या.