तिरुवनंतपुरम : केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मुन्नारजवळील झालेल्या भूस्खलनातील बळींची संख्या आज 56 वर पोहोचली आहे. ढिगाऱ्याखालून एक मृतदेह काढण्यात आल्याने ही संख्या वाढल्याचे इडुक्कीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
राजमाला भूस्खलनाच्या दुर्घटनेत 56 लोकांचा मृत्यू झाल्याचे इडुक्कीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर अद्याप 14 लोक बेपत्ता आहेत.
भूस्खलन झालेल्या ठिकाणी एनडीआरएफचे पथक कार्यरत आहे. तसेच इडुक्कीचे अग्नीशमन आणि बचावकार्याचे पथक, कोट्टयाम, तिरुवनंतपुरममधील प्रत्येकी एक पथ आणि विशेष टीम कार्यरत असल्याचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.
केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी मृताच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
केरळमध्ये अनेक भागात अतिवृष्टी निर्माण झाल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत भूस्खलनाच्या घडल्या आहेत.
दरम्यान, भूस्खलनाच्या सात ऑगस्टच्या दुर्घटनेत २० रो-हाऊसेस उद्धवस्त झाली आहेत. या घरांमध्ये ८२ कामगार आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. तेव्हापासून विविध बचाव पथके अडकलेल्या नागरिकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.