नवी दिल्ली - केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज(11 जानेवारी) जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोष हिची भेट घेतली. यावेळी पिनाराई यांनी 'नागरिकत्व सुधारणा कायदा आणि फी वाढी विरोधात छेडलेल्या आंदोलनात संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे' असे आयेशीला म्हटले आहे.
विजयन यांनी नवी दिल्लीतील केरळ भवन येथे आयेशीची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयेशीला सुधन्वा देशपांडे लिखित 'हल्ला बोल: द डेथ अँड लाइफ ऑफ सफदर हाश्मी' हे पुस्तक भेट म्हणून दिले. तसेच, दुखापतीविषयी तिची विचारपूसही केली. यावेळी, ते आयेशीला म्हणाले "सर्वांना 5 जानेवारीला जेएनयूत काय झाले हे माहित आहे. संघ परिवार हिसेंच्या माध्यामातून मतभेदांवर मात करू इच्छित आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांच्या या कटाविरोधात एक निर्भिड लढा उभारला आहे. त्यामुळे, संपूर्ण देश या न्यायाच्या लढाईत तुमच्या सोबत आहे"
हेही वाचा -'माझ्यावर हल्ला झाल्याचा पुरावा माझ्याकडे आहे' आयेशी घोषकडून आरोपांचे खंडन
विजयन यांच्या भेटीनंतर आयेशीने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "कॉम्रेड पिनराई म्हणाले, 'पुढे जात रहा' आणि हीच मी त्यांच्या कडून घेतलेली प्रेरणा आहे. काहीही झाले तरी आम्ही ही लढाई लढत राहणार. आमच्या सर्व आंदोलनांमध्ये केरळमधील जनता सतत आमच्या बाजूने उभी राहिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते"