तिरुअनंतपुरम - केरळमध्ये सध्या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे वाढत्या दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढवण्यासाठी तेथील सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कांदा, टमाटे, बटाटे याचा थेट उत्पादक शेतकरी आणि कृषी उत्पादक संघटनांकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विजयन यांनी महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची थेट खरेदीबाबत मदतीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात विजयन यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना केरळच्या कृषी माल खरेदी-विक्री करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासंदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. केरळ सरकारच्या या धोरणामुळे महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील शेतकऱ्यांना चांगला दरही मिळेल असेही विजयन यांनी या पत्रात म्हटले आहे.
केरळ राज्यात सध्या कांद्याच्या दरामध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढ होत आहे. या परिस्थितीत बाजारातील दर नियंत्रित ठेवण्याकरीता प्रत्यक्ष खरेदी गरजेचे असल्याचे मत केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी व्यक्त केले आहे.
केरळ मध्ये एमएसपी लागू-
केरळ सरकार हे शेती उत्पादनाला एमएसपी लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यास दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार जर बाजारात उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी दर मिळत असेल तरीह राज्य सरकारने निश्चित केलेल्या किमतीतच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. उत्पादन खर्चाच्या २० टक्के अधिक हा दर निश्चित करण्यात आला आहे. तर या योजनेअंतर्गत १६ प्रकारच्या भाजीपाल्याचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातही भाज्यांचे भाव वधारले-
महाराष्ट्र राज्यात विशेषत: पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटली असून बाजारातील दरामध्ये तेजी आली आहे. कांदा जवळपास ९० रुपये किलोच्या दराने विक्री केला जात आहे. तर अन्य भाजीपाल्याच्या किमतीतही २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.