नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सफाई कामगार, डॉक्टर अन् परिचारिका आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार १ कोटीची नुकसान भरपाई देईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांमधील डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी, लॅब टेक्नीशियन या संसर्गाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्यास दिल्ली सरकार त्यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई देईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
शहरामध्ये स्वच्छताविषयक मशीन्स तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्यावर सामाजिक अंतर राखावे. सर्वांनी आपापल्या घरी राहावे, शेजार्याच्या घरी जाऊ नये, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील तीन सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता दिल्लीतील यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.