गुवाहटी - आसाम राज्यात पुराने हाहाकार घातला आहे. पुराच्या पाण्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ९० टक्के बुडाले आहे. त्यामुळे आसाम सरकारने काझीरंगा उद्यानाजवळून जाणाऱ्या महामार्ग क्र. ३७ वर वेग मर्यादा लागू केली आहे. तर राज्यात पुरामुळे आत्तापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे गुवाहटी शहराला धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग ३७ वर ४० किमी प्रतितास वेग मर्यादा वाहनांसाठी निश्चित करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी वेगमर्यादा तपासण्यासाठी चेकपोस्ट तयार केले आहेत. पोलीस, वाहतूक विभाग आणि प्रशासन वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी एकत्र काम करत आहे, असे काझिरंगा उद्यानाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महामार्गावरुन वेगाने जाणाऱ्या वाहनांची धडक बसून २ हरणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे निर्बंध लागू केले आहेत.
उद्यानामध्ये प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी असलेल्या १९९ तळांपैकी १५५ तळ पूराच्या पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे सुरक्षा अधिकारी यांत्रिक बोटीद्वारे उद्यानातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. तसेच प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी भादंवि नुसार कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे.
आणीबाणी परिस्थितीत तत्काळ मदत देण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडे वायरलेस फोनही देण्यात आले आहेत. मांस आणि शिंगांसाठी होणारी प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी आसाम सरकारने कंबर कसली आहे.