श्रीनगर-कोरोना संकटाच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. श्रीनगरमधील इरफाना झरगर हिने काश्मीरमध्ये मुली आणि महिलांना सॅनिटरी पॅडसचे मोफत वाटप केले. सॅनिटरी पॅड सोबतच इतर आवश्यक औषधे आणि सॅनिटायझर देखील तिने वाटले आहेत. या उपक्रमामुळे तिचेे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले यामुळे काश्मीरमधील महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. बाहेर पडण्यास परवानगी नव्हती आणि दुकाने बंद असल्यामुळे महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध होत नव्हते, त्यांची ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न इरफाना झरगर हिने केला.
इरफाना झरगर ही एका खासगी कंपनीत काम करते. तिने मोफत वाटत असलेल्या वस्तूंच्या किटला इव्हा सेफ्टी किट असे नाव दिले आहे. हा उपक्रम तिने वडील गुलाम हसन यांना अर्पण केला आहे.
इरफानाचे पुढील ध्येय श्रीनगर मधील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये हे मोफत सॅनिटरी पॅडचे वितरण करण्याचे आहे. श्रीनगर मधील 15 स्वच्छतागृहांमध्ये इरफान हिने सॅनिटरी पॅड वितरित केले आहेत. या किटमध्ये सॅनेटरी नॅपकिन, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्ड वॉश आणि इतर औषधे यांचा समावेश आहे.
माझ्या मनात सॅनिटरी किटचे वाटप करण्याची संकल्पना आली त्यामुळे मी हा उपक्रम सुरू केला,असे इरफाना हिने म्हटले. श्रीनगर मधील 15 स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी किट दिल्यानंतर हा उपक्रम ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा इरफानाचा मानस आहे.
महिला समाजाच्या उभारणीतील महत्त्वाचा घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,असे इरफाना झरगरने म्हटले. आपल्या समाजाला प्रगती करायची असेल तर महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही तिने सांगितले.
लॉकडाऊन दरम्यान आम्हाला घराबाहेर जाऊन ज्या वस्तू खरेदी करता येत नव्हत्या त्या वस्तू आम्हाला इरफानामुळे मिळाल्या. ती चांगले काम करत आहे, असे मरियम जैन या महिलेने या महिलेने म्हटले आहे.
डॉ. शाजिया मेहराज यांनीदेखील इरफाना हिच्या उपक्रमाला सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. इरफाना झरगर सारख्या मुलींनी सुरू केलेल्या उपक्रमामुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडून येतील असे मत त्यांनी व्यक्त केले.